'मागेल त्याला शेततळे' योजना आता नव्याने येणार; आमदार धिरज देशमुख यांनी अधिवेशनात प्रश्न मांडल्याने कृषिमंत्र्यांनी दिली ग्वाही
'मागेल त्याला शेततळे' योजना आता नव्याने येणार
आमदार धिरज देशमुख यांनी अधिवेशनात प्रश्न मांडल्याने कृषिमंत्र्यांनी दिली ग्वाही;
आचारसंहिता लागण्यापूर्वी योजना अधिक व्यापक होणार
लातूर : 'मागेल त्याला शेततळे' म्हणता; मग शेतकऱ्यांचे अर्ज का नाकारता? योजना सरकारची मग कृषी आणि रोहयो या दोन विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानात तफावत का? अशा मुद्द्यांकडे 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे दोन्ही विभागात समन्वय साधून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी याबाबतची योजना नव्याने लागू करण्याची ग्वाही राज्य सरकारच्या वतीने कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात दिली.
'मागेल त्याला शेततळे' योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले जात आहेत. या गंभीर विषयाबाबत हिवाळी अधिवेशनात 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी गुरुवारी (ता. १४) तारांकित प्रश्न मांडला. त्यानंतर कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी आपल्या उत्तरात कृषी आणि रोजगार हमी योजना या विभागाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक घेवू. समन्वय साधून ही योजना अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेवू. जेणेकरून राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असे नमूद केले.
आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, शेततळे ही अत्यंत चांगली योजना आहे. पावसाने खंड दिल्यास पिकांना पाणी अपुरे पडू नये यासाठी शेततळ्यांचा शेतकऱ्यांना चांगला आधार मिळतो. इतकी महत्वकांक्षी योजना असूनसुद्धा याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकारने मराठवाड्यातील रोजगार हमी योजनेतील २८ हजार ९४४ अर्ज मंजूर केले. पण, निम्म्याहून अधिक शेततळ्याची कामे अद्याप सुरू झाली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
राज्यात दुष्काळाची, पाणी टंचाईची स्थिती आहे. असे असूनसुद्धा मागेल त्याला शेततळ्यासाठी हजारो शेतकऱ्यांचे अर्ज मागील काही महिन्यात नाकारण्यात आले. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी अधिक अडचणीत आला आहे. असे प्रकार पुन्हा होवू न देता ही योजना प्रभावीपणे व सुलभपणे राबवली जावी, अशी अपेक्षा आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केली. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार नाना पटोले, आमदार बबनराव लोणीकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार भास्कर जाधव, आमदार आशिष शेलार आदींनी देखील या प्रश्नाबाबतच्या चर्चेत सहभाग घेतला.
---
कोट
कृषिमंत्री हे दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. 'मागेल त्याला शेततळे' योजनेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेवून त्यांनी या योजनेला व्यापक व सुलभ करून गती देण्याचा निर्णय घेतला. याबाबत मी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
- श्री. धिरज देशमुख,
आमदार, लातूर ग्रामीण
---
चौकट :
असे आहे लातूरमधील चित्र
लातूर जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजने'अंतर्गत २१० पैकी केवळ ४७ शेततळे पूर्ण झाले आहेत. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती मार्फत मान्यता दिलेल्या २८५ पैकी केवळ २८ शेततळे पूर्ण झाले आहेत. तसेच, रोजगार हमी योजनेतील १ हजार ४०८ पैकी केवळ ६१८ शेततळे पूर्ण झाली आहेत. उर्वरित शेततळे अद्याप पूर्ण झाली नाहीत.
----