#लोकनेते विलासराव देशमुख
#साहेब आमच्यासाठी सर्वस्व होते.
#ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना नेहमीच त्यांनी बळ दिले. कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले. साहेब मंत्री व मुख्यमंत्री जरी असले तरी आमच्या सोबत ते नेहमी प्रेमाने वागायचे. कधीही पदाचा त्यांनी बडेजावपणा केला नाही. साहेबांच्या पहिल्या निवडणुकीत केलेला प्रचार मला आज देखील आठवतो. त्यावेळी बी.व्ही.काळे साहेबांनी प्रचारासाठी आम्हाला जीप दिली होती. त्याकाळी जीप म्हणजे खूप मोठेपणा समजला जायचा. गावोगावी आम्ही प्रचार करत तेथील परस्थीतीचा आढावा घेत होतो व सायंकाळी साहेबांना तो आढावा सादर करून त्यानुसार प्रचारात नियोजन केले जात होते. एवढ्या बारकाईने व मोठ्या कष्टाने साहेबांनी विजय मिळवला होता. साहेबांना सुरूवातीच्या काळात विरोधकांकडून खूप त्रास दिला जायचा. मात्र ते कधीही डगमगले नाहीत. एकदा आमच्या भागात साहेबांची प्रचार सभा होती.
#निवडणुक अटी-तटीची होती. साहेब स्वत: सभेला येणार असल्याने विरोधकांना धास्ती लागली होती. आम्हाला कळून चुकले होते की, साहेबांच्या सभेत विरोधक काहीतरी अडचण आणणार आणि नेमकं सभा सुरू होण्यापूर्वी साहेबांची जेथे सभा होणार होती त्यापासून थोड्या अंतरावरच एका घरावर मोठ्या आवाजात त्यांनी माईकवर गाणे सुरू केले. वातावरण तणावाचे होणार होते. साहेब एका कार्यकर्त्याच्या घरी चहासाठी थांबले होते. साहेबांना ही गोष्ट समजली. मी तेथेच होतो. साहेब म्हणाले, त्यांना जे करायचे आहे ते करू द्या. तुम्ही शांत रहा. एवढ्यात मी बाहेर आलो. साहेबांनी ओळखले की मी काहीतरी करणार. तेथून मी सभेच्या ठिकाणी आलो. योगा-योगाने गावात दोन डीपी होत्या. ज्या डीपीवरून विरोधकांच्या माईकवर गाणे सुरू होते तो डीपीच बंद पाडला. साहेबांची सभा जोरदार झाली. सभा संपल्यानंतर साहेबांनी मला बोलावून घेतले आणि नेमकं काय केलात हे विचारले. घडला प्रकार साहेबांना सांगितला तेंव्हा साहेब हसले व म्हणाले, काळजी करू नका कोणी काही बोललं तर मला सांगा मी आहे तुमच्या पाठीशी. साहेबांसाठी आम्ही काहीही करण्यास तयार असायचो. त्याचं कारण साहेबांचा मनमिळाऊ स्वभाव होता.